मुंबई : मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी नुकताच विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या कामासाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत आहे. मात्र पक्ष सोडून आपण कुठेही जाणार नाही, असे तुर्डे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत संजय तुर्डे कलिना येथील प्रभागातून निवडून आले होते. या निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी होऊन मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले होते. त्यापैकी माजी नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा तुर्डे हे एकमेव मनसेसोबतच राहिले होते. दरम्यान, आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भविष्यात मनसेतच राहणार, अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.