मुंबई : मुंबईतील एका कंपनीचे नेट बँकिंग खाते हॅक करून १९ लाख रुपये इतर खात्यांमध्ये हस्तांतरीत केल्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी शनिवारी राजस्थानमधून दोघांना अटक केली. कंपनीचे संचालक नेपियन्सी रोड रहिवासी असून त्यांच्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सतेंद्र राजावत (४४) आणि मुकेश चौधरी (३५) अशी अटक आरोपींची नावे असून दोघेही राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपी ई-कॉमर्समध्ये व्यवहार करतात आणि उत्पादने ऑनलाइन विकतात. त्यामुळे दोघांनाही ऑनलाईन बँकिंगबाबतची चांगली माहिती आहे. आरोपींनी कंपनीचे ऑनलाईन बँक खाते २५ मेला हॅक केले होते. त्यानंतर त्यांनी लाभार्थी म्हणून काही बँक खाती तक्रारदार कंपनीच्या खात्याशी जोडली. त्यानंतर आरोपींनी १९ लाख रुपये त्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केले. या व्यवहारांबाबत कंपनीच्या संचालकाला संदेश आले. पण त्यांनी असे कोणतेही व्यवहार केले नसल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार केली.
पो हॅकिंगसाठी आरोपींनी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरला होता, असे पोलिसांनी सांगितले. फसवणूक करण्यासाठी त्यांनी जी बँक खाती जोडली. त्यांची माहिती पोलिसांनी घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर तपासात त्या खात्यांवरूनही इतर खात्यांमध्ये रक्कम गेल्याचे निष्पन्न झाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी केलेल्या तपासात व बँक खात्यांबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयीत आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार राजस्थानमध्ये पथके पाठवून दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. ते सापडल्यानंतर त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. फसवणूकीच्या रकमेबाबत आरोपींची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलमांतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ओळख चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या इतर साथीदारांची माहिती घेण्याचे काम सुरूअसून या टोळीने अशा प्रकारे इतर गुन्हे केल्याचाही संशय पोलिसांना आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


