मुंबई : परदेशी चलन बेकायदेशिररित्या थायलंडला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून सव्वाकोटी रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोटो टानी (४७) व गुन्यापुनईसा फूनासेट (४१) अशी अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांची नावे आहेत. यातील टानी हा जपान येथील ओसाका येथील रहिवासी आहे, तर फूनासेह ही महिला थायलंडमधील बँकॉकमधील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून १०० अमेरिकन डॉलरच्या १,४१५ नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक कोटी १५ लाख ३९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थाय एअरवेजच्या विमानातून बँकॉकला जाणारे दोन परदेशी नागरिक बेकायदेशिररित्या परदेशी चलन घेऊन जात असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाला (एआययू) गुरुवारी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सापळा रचला होता.
दोन परदेशी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद वाटताच सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडील निळ्या रंगाच्या पिशवीत १,४१५ अमेरिकन डॉलर सापडले. त्याबाबत चौकशी केली असता दोघांनीही सीमाशुल्क विभागाला कोणतेही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी परदेशी चलन जप्त केले. तसेच या दोन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी परदेशी चलनाची तस्करी करीत असल्याचे मान्य केल्यानंतर शनिवारी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही अटक केली. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्यासह फेमा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही या दोघांनी परदेशी चलनाची तस्करी केली होती का? याबाबत सीमाशुल्क अधिकारी अधिका चौकशी करीत आहेत.


