मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी. आज दि: 22 जून 2023 परळी शहरात दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत भयानक राडा झाला असून यामध्ये एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना परळी शहरातील बरकत नगर ते जिल्हा परिषद कन्या शाळा रस्त्यावर दोन गटात अचानक हाणामारी सुरू झाली. या घटनेत एक व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका लग्न समारंभात परळी तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी असलेले अल्लाउद्दीन हबीब शेख वय 45 वर्ष हे बरकत नगर येथे लग्न कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्यावर तीक्ष्ण धारदार शस्त्राने सपासप छातीवर, पोटावर, मानेवर, वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून मयतास परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या खुनाचे कारण अद्याप कळाले नसून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने परळी शहरात व परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेच्या ठिकाणी रक्ताचा सडा पाहून महिला व लहान मुलांमध्ये काही वेळासाठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.