नवी दिल्ली : शिवसेना पक्ष तसेच त्याच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे आणि ठाकरे गटाने दावे केलेले आहेत. या वादावर येत्या 12 डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी घेणार असल्याची माहिती मंगळवारी (दि.२९) सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांच्या युक्तिवादाला 12 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी आपापली कागदपत्रे सादर केलेली आहेत. दोन्ही गटांना जर अजुनही काही कागदपत्रे सादर करायची असतील किंवा काही मत मांडायचे असेल, तर ते 9 डिसेंबररोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडू शकतात, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर पक्ष तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. दुसरीकडे ठाकरे गटाने मूळ पक्ष आपलाच असल्याचे सांगत धनुष्यबाणावर दावा ठोकला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात पोहोचले होते. आयोगाने दोन्ही गटांना 23 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी आपापली कागदपत्रे सादर केलेली आहेत. दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती एकमेकांना द्याव्यात, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. शिंदे—ठाकरे गटाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर आयोगाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते. त्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी नावे व चिन्हे देण्यात आली होती.