महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील कुडरारा-चिरादेवी पांदण रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले असून कुडरारा व गोरजा गावातील नागरिकांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले आहे. तालुक्यातील कुडरारा-चिरादेवी या पांदण रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली होती. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी सामग्री घेऊन जाणे जिकरीचे झाले होते. बैलबंडीसुद्धा जाऊ शकत नव्हती. त्यामुळे बियाणे, खते यांच्या पिशव्या, शेतीचे साहित्य खांद्यावर घेऊन जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत होती. शेतातील पिक निघाल्यानंतर ते घरी कसे न्यायचे हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर होतो. त्यामुळे कुडरारा-गोरजा गट ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण टेकाम व उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी दि.१६ जून २०२० रोजी राज्याचे पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे एक निवेदन सादर करुन रस्त्याच्या बांधकामाची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या रस्त्याच्या बांधकामाची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार दि.९ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या बांधकामाकरिता प्रशासकीय मान्यता दिली व १५ लाख रुपये तातडीने मंजूर केले. सदर खर्च जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी कुडरारा-गोरजा गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावक-यांना सदर पांदण रस्त्याचे बांधकाम करुन शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचा शब्द दिला होता. तो आता पूर्ण केल्याने श्रावणी घोरुडे यांचे कुडरारा, गोरजा, चिरादेवी आणि परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे.


