महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.८:-एक साधे पोलिस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झालेले भद्रावतीचे सुपुत्र प्रशांत जगन्नाथ जुमडे हे आज गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर असुन प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत
आहेत.त्यांची नुकतीच पदोन्नती झाली असून ते येथील शिवाजी नगर वार्डातील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच वार्डातील जि.प. प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण येथील लोकमान्य विद्यालयातून पूर्ण केले. पुढे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण करुन ब्रम्हपुरी येथील तंत्र निकेतन महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग व्यवसायात डिप्लोमा मिळविला. त्यानंतर चांदा आयुध निर्माणीत एक वर्ष अप्रेंटीसशीप केली. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा असतानासुद्धा अभियंता होण्याची अपेक्षा न ठेवता मिळेल ती नोकरी करायची या भावनेतून सन २००० मध्ये पोलिस दलात पोलीस शिपाई पदाची परीक्षा दिली. त्यात ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्याने त्यांची पोलिस शिपाई पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर ८ वर्षे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून काम केल्यानंतर सन २००८ मध्ये विभागातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली. त्यात ते उत्तम रितीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण होताच ते नागपूर येथे तहसील पोलिस स्टेशनला २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर २०१४ मध्ये बढती मिळून सदर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिस स्टेशनला काम केल्यानंतर त्यांची २०१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात बदली झाली. तेथे त्यांना मुलचेरा पोलिस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. दि.२ फेब्रुवारी रोजी नुकतीच त्यांना पोलीस निरीक्षक या पदावर बढती मिळाली असून त्यांना नागपूर शहर येथे नियुक्ती मिळाली आहे.
पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक असा त्यांचा पोलिस दलातील प्रवास इतर तरुणांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा असून भद्रावतीकरांची मान उंचावणारा आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.