अंकुश जागले तालुका प्रतिनिधी शहापूर
बिबट्याच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली पण वन अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मुलाचा मृतदेह संध्याकाळपर्यंत जंगलातच पडून राहिल्याची संतापजनक घटना शहापुरात घडलीय.शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा येथील कृष्णा भागवत अगीवले हा ८ वर्षीय मुलगा मित्रांसोबत दररोज आंबे पाडण्यासाठी जात असे.आज देखील सकाळची शाळा सुटल्या नंतर मित्रांसोबत आंबे पाडण्यासाठी गेला असता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने कृष्णावर अचानक हल्ला केला व त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.ही बाब गावकऱ्यांना माहिती होताच तत्काळ गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. गावकरी पोहोचेपर्यंत बिबट्याने कृष्णा अगीवले याला ठार मारले होते.या घटनेची माहिती पोलिस व वनविभागाचे अधिकारी यांना मिळाली. कसारा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी वेळीच न आल्याने जंगलात मृतदेहाचा पंचनामा कोण करणार, एवढ्यावरून कृष्णाचा मृतदेह संध्याकाळपर्यंत जंगलात पडून होता.









