संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड आणि बारामती रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांची भेट घेतली. या बैठकीत प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी सध्या सुरू असलेल्या डेमू (DMU) गाड्यांच्या जागी पुणे-दौंड आणि पुढे लोणावळ्यापर्यंत EMU (इलेक्ट्रिक) लोकल सुरू करण्याची मागणी आमदार कुल यांनी केली. तसेच दौंड शहराला ‘उपनगर’ घोषित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना तसे पत्रही दिले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. रेल्वेमध्ये महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र कोचची (डब्यांची) सेवा तातडीने उपलब्ध करून ती अधिकृतपणे जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. सकाळी ०८:२५ ते सायंकाळी ५:०० या वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या दरम्यान दौंड-पुणे नवीन लोकल सुरू करावी, अन्यथा प्रवाशांसाठी पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार कुल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. आगामी काळात हडपसर-यवत उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येणार असून मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून रेल्वेने आपल्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली. पुणे, दौंड आणि बारामती मार्गावरील सर्व लोकल गाड्या वेळेत चालवण्यात याव्यात. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी विविध एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे वाढवण्याबाबत चर्चा झाली. ज्या गाड्या सध्या मुंढवा/ हडपसर येथे थांबतात, त्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात याव्यात, अशी सूचनाही आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.आमदार राहुल कुल यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांची सुरक्षा, आरक्षणाची सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत रेल्वे प्रशासन तातडीने कार्यवाही करेल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवाशांच्या हितासाठी आणि रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही निरंतर सुरू राहील, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केला.








