टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपददक जिंकवून दिले होते. भारताचा नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल झाला होता आणि त्याच्याकडून आज सुवर्णपदकाची अपेक्षा होती. नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी एवढ्या लांब भाला फेकला आणि तो आता पदक पटकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. कारण पात्रता स्पर्धेपेक्षा त्याची ही कामगिरी नक्कीच उजवी होती. दुसऱ्या फेरीत तर नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकला आणि जवळपास पदक निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीत नीरजने ७६.७९ मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. चौथ्या फेरीत नीरजचा फाऊल झाला होता, पण तरीही तो अव्वल स्थानावरच होता.
यापूर्वी झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर थ्रोसह अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे त्याच्याकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. नीरजला यावेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून कडवी झुंज मिळेल, असे दिसत होते. नीरजला पाहूनच अर्शद हा भालाफेक या क्रीडा प्रकारात वळल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानचा नदीम यापूर्वी क्रिकेट खेळायचा, पण त्याने हा खेळ सोडून अॅथलेटिक्समध्ये नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नदीमने सांगितले होते की, नीरजला पाहूनच त्याने भालाफेक खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ज्याच्याकडून प्रेरणा घेऊन अर्शदने भालाफेक खेळायला सुरुवात केली होती. आता नीरज आणि अर्शद हे दोघे एकमेकांसमोर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.