-घरकुलास जागा देणे संदर्भात केली चर्चा
संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी अनेक बेघर कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत, मात्र त्यांचेकडे स्वतःची जागा नसल्याने सदरची घरकुले अद्यापी प्रलंबित आहेत. त्यामुळे जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून जागेसाठी गायरान व गावठाणातील जागा देणे संदर्भात आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करणेसंदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बुधवारी (दि. 25) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गरीब व वंचित कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, हा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या बेघर कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध होणे गरजेचे असून, ही बाब अत्यंत संवेदनशील असून संबंधित कुटुंबांच्या मूलभूत हक्कांशी निगडित आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. समाजातील शेवटच्या गरीब घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे, हे आपले सर्वांचे उद्धीष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई मिसाळ, सागर मिसाळ उपस्थित होते.






