भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू : समाजातील विविध स्तरांवरील समस्यांवर कार्य करणाऱ्या ‘दृष्टीकोन’ सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्हा प्रमुख समन्वयकपदी सुदाम कृष्णा मेरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार वाढवण्यासाठी आणि जिल्हास्तरीय समन्वय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. सुदाम मेरे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबवले जाईल, अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नियुक्तीनंतर सुदाम मेरे यांनी संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करत समाजाच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘दृष्टीकोन’ ही संस्था सामाजिक न्याय, शैक्षणिक जागरूकता आणि आदिवासी व ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत आहे. भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी ‘दृष्टीकोन’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिजित देसक, सहसचिव कौशल कामडी, खजिनदार डॉ. अक्षय गडग आणि सभासद प्रविण वरठा यांच्या उपस्थितीत सुदाम मेरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


