महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावरील प्रकार
अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: पहिल्याच दिवशी इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातील दहावीच्या परिक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची वार्ता काही वेळातच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली, त्यानंतर मोठी खळबळ उडाली. महागांव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार अभय म्हस्के, गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड व पोलीसांचा ताफा कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर धडकला. परीक्षा सुरु होण्याआधीच पेपर व्हाट्सअॕपवर व्हायरल झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्याम कान्होजी तास्के यांच्या कार्यालयात पार्टीशन करून तयार केलेल्या खोलीची पाहणी केली असता, व्हाट्सअॕप वर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या फोटोखाली असलेला तळाचा भाग व शाळेतील फ्लोअरचा भाग एकच असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. केंद्र संचालक श्याम तास्के यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला. आदर्श विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर एकुण २२१ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, २२५ प्रश्नपत्रिका बोर्डाकडून पाठविण्यात आल्या होत्या. गठ्ठयातील उर्वरित ४ प्रश्नपत्रिकांपैकी १ प्रश्नपत्रिका चोळामोळा केलेली आढळून आली, त्यावरून केंद्र संचालक श्याम तास्के यांनी दहावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईल द्वारे फोटो काढून प्रश्नपत्रिका लिक केल्याचे उघड झाले. शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी लगेच या घटनेची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यानंतर केंद्र संचालक श्याम तास्के आणि ही प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या एका मोबाईल क्रमांक धारक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.

