भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
सूर्यनमस्काराचे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांच्या सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे. याबद्दलची जनजागृती समाजामध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने रथसप्तमी, तसेच जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून ‘सूर्यनमस्कार यज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन के. डी. हायस्कुलच्या मैदानावर दि.४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. क्रीडा शिक्षक प्रा. सुधीर भांडवलकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षणार्थींना ‘सूर्यनमस्काराचे मानवी शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम’, याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी ‘सूर्यनमस्कारातून व्यक्ती व व्यक्तीद्वारे बलवान राष्ट्रनिर्माण व्हावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पालघर जिल्हा परिषदेतील शालेय विद्यार्थी, तसेच एम. बी. जोशी स्कूल, रा. हि. सावे विद्यालय, के. डी हायस्कूल, एम. के. ज्युनिअर कॉलेज, श्री. पी. एल. श्रॉफ महाविद्यालय (NSS व NCC) इ. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ यांनी सूर्यनमस्काराचे स्वतःच्या जीवनावर आणि आरोग्यावर झालेले सकारात्मक परिणाम सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या योगशिक्षिका पूजा चौधरी यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जागतिक पातळीवर सूर्यनमस्काराच्या स्वीकाराबद्दलही त्यांनी चर्चा केली.
पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच असा मोठ्या स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राचार्य महेश रावते, प्रा. जनार्दन शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. सुचिता करवीर, उपमुख्याध्यापक सुनील बैसाने, पर्यवेक्षक प्रा. सुरज आष्टेकर, प्रा. दिनकर टेकनर, तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन प्रा. संजय घरत यांनी, तर आभार प्रा. कॅप्टन पद्मा माने यांनी मानले.

