भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील बोर्डी नजीकच्या एका गावात सापाची एक दुर्मिळ प्रजाती आढळून आली आहे. ठाणे येथील वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या सदस्यांनी या सापाला पकडले असून त्याच्यावर संशोधनासाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत नेण्यात आले होते. मात्र पालघर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या वाइल्डलाइफ कन्सर्वेशन आणि ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या मागणीनुसार सर्प डहाणू येथील प्रयोगशाळेत आणून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
बोर्डी नजीकच्या एका गावातील वाडीत उडता सोनसर्प (‘क्रिसोपेलिया ऑर्नेटा फ्लाईंग स्नेक’) या दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. याची माहिती वाडी मालकाने वसई येथील परिचितांना दिल्यानंतर ठाणे येथील ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी त्याठिकाणी जाऊन सापाला पकडल्याची माहिती देण्यात येत आहे. यांनतर या सापाच्या अभ्यासासाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याच्यावर अभ्यास करून नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार होते. मात्र स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या डब्ल्यू. सी. ए. डब्लू. ए. या संस्थेला या भागातील वन्य प्रजातींची माहिती अधिक असल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वनविभागाला सूचना देऊन या दुर्मिळ सापाचा अभ्यास करण्याची मागणी केली. त्यानुसार सध्या ठाणे येथून साप डहाणू येथे आणण्यात येत असून वनविभागाच्या परवानगीने पूर्वी आढळलेल्या सापांच्या अभ्यासानुसार या सापाचा अभ्यास करून त्याचा अधिवास डहाणू तालुक्यातील आढळल्यास त्याला पुन्हा याच भागात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
सोन सर्प ही सापाची दुर्मिळ प्रजाती असून महाराष्ट्रात हा साप सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह डहाणू तालुक्यातील बोर्डी, अस्वाली नजीकच्या बारड गडाच्या जंगलात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वेळा या सापांचे सांगाडे जंगलात आणि समुद्र किनारी भागात मिळून आल्याचा दावा वन्यजीव अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे या सोन सर्पाचा अधिवास डहाणू तालुक्यातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सापाला डहाणू येथे आणल्यावर त्याचा अभ्यास करून आवश्यक असल्यास डी.एन.ए. आणि आर.एन.ए तपासणी केली जाणार असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासकांकडून देण्यात आली आहे.
उडणारा सोनसर्प हा निमविषारी प्रजातीचा साप असून या सापाला मराठीत तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोन सर्प अशी नावे आहेत. हा साप दुर्मिळ असून यापूर्वी महाराष्ट्रात पश्चिम घाटातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर मधील डहाणू तालुक्यात आढळला आहे. उंच झाडांमध्ये वास्तव्य करणाऱ्या हा साप एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उद्या मारत असून ऊनात याचा सांग सोन्यासारखा चमकत असल्यामुळे याला उडता सोनसर्प म्हणतात.
उडणारा सोन सर्प यापूर्वी डहाणू तालुक्यातील बारड डोंगराच्या परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे या सापाचा अधिवास या भागात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एका वाडी मध्ये हा साप आढळला असून मालकाने ठाणे येथील संस्थेला कळवल्यामुळे त्यांनी साप ताब्यात घेतला होता. मात्र आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या भागात काम करत असून या भागातील वन्य जिवांची माहीती आमच्याकडे असल्यामुळे हा साप अभ्यासासाठी आमच्या ताब्यात देण्यात येत आहे. आम्ही यापूर्वीच्या नोंदी तपासून सापाचा अधिवास या भागात असल्यास त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणार आहोत.
- सागर पटेल, वन्यजीव अभ्यासक वाईल्डलाइफ कंसर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन डहाणू

