सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: आजच्या धकाधकीच्या जीवनात मस्तकापासून ते तळ पायापर्यंत विकार मुक्तीसाठी व सुदृढ मनासाठी अष्टांग योग असलेला सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. ‘उजेडी राहिले उजेड होऊन’ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे पहाटे सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करून आपले तेजोमय आयुष्य अधिक सुदृढ आणि सुखकर करण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन उपक्रमशील प्राध्यापक अमोल अहिरे यांनी केले ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील क. महाविद्यालयात रथसप्तमी तथा जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून आयोजित सामूहिक सुर्यनमस्कार कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रा. पी. जी. माने होते. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, प्रा. एस. टी. जाधव, पी. यू. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने मानसिक, शारीरिक व आत्मिक बल वाढते, मनाची एकाग्रता वाढते, हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढून बाहु व कंबरेचे स्नायू बळकट होतात. पचनक्रिया सुधारते, तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. यासाठी प्रत्येकाने किमान बारा नियमित सूर्यनमस्कार करावेत असे आवाहन प्रा. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी रथसप्तमीचे महत्व सुर्यनमस्काराचे फायदे, प्राणायाम, योगासनाची आवश्यकता विशद करुन, ऐक्यमंत्र व बीजमंत्रासह १२ स्थितीचे सुर्यनमस्कार घेतले. प्रसंगी त्यांनी शिथिलीकरण व सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.