प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी
दि.२३ डिसेंबर परभणी जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या वातावरण बदलाचा फटका बसत आहे. त्यातच जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गव्हाच्या पिकांची वाढ खुंटणार असून हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात दमदार पावसाबरोबरच अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यातच सरकारकडून पीक नुकसानीचे तुटपुंजे अति अल्प अनुदान देऊन शेतकऱ्यांची बळवंत केली असून अद्यापही काही शेतकऱ्यांना नुकसानी चे अनुदान मिळाले नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी करडी या आधी पिकांची पेरणी कशीबशी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली. रब्बी हंगामातील पेरणी केल्यानंतर कधी थंडी तर कधी उन्हाचे चटके असे वातावरण राहत आहे. वातावरणामध्ये सतत बदल होत असल्यामुळे गहू हरभरा या दोन पिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पहाटेच्या वेळी दाट धूक पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीमध्ये घट होऊ लागली आहे. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक शेत शिवारात चांगले आलेले असताना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गव्हाच्या पिकांची वाढ खुंटणार असल्याने उत्पादनामध्ये फटका बसणार आहे. तर दुसरीकडे हरभऱ्याला फुले व घाटे लागण्याच्या अवस्थेत आले असून ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे.


