अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: ६ वर्षापासून रखडलेला महागाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रकल्प, महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या प्रयत्नाने अखेर तडीस गेला आहे. महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या ऐतिहासिक उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने आज अत्यंत तत्परतेने ग्रामीण रुग्णालयाची फित कापून रुग्णालय जनतेच्या सेवेत समर्पित केले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.महागाव तालुका पत्रकार महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महागाव तालुका पत्रकार महासंघाने आक्रमक पवित्रा घेत ऐतिहासिक आमरण उपोषण केले होते. महागाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाची इमारत ६ वर्षापासून तयार आहे. परंतू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले हे रुग्णालय सुरू होत नव्हते त्यामुळे ३० ते ४० गावातील रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला होता. बांधकामातील सटरफटर त्रुटी वगळता येथे उपकरणे,बेड, व भौतिक सुविधा उपलब्ध होत्या. पद मान्यताही करण्यात आली होती. पदभरतीचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी स्वतः नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले होते. महागाव तालुका पत्रकार महासंघाने महागाव येथील प्रलंबित ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी ऐतिहासिक आमरण उपोषण केले. या आंदोलनाची शासनाने व प्रशासनाने दखल घेतली होती. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अश्वासनानंतर महागाव तालुका पत्रकार महासंघाने आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले होते. त्यानंतर पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नामदेवराव ससाने, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत वारंवार पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी आपली आग्रही भूमिका कायम ठेवली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार नामदेवराव ससाने यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यासोबत महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती. गुरुवार दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर अधिवेशनादरम्यान ना. तानाजी सावंत यांच्यासोबत आमदार नामदेवराव ससाने, गजानन वाघमारे, अध्यक्ष गणेश पाटील भोयर, नंदकुमार कावळे, दीपक आडे यांची चर्चा झाली होती. महागाव ग्रामीण रुग्णालयात ५ अस्थायी पदेही भरण्यात आली मात्र, रुग्णालयाचे कामकाज सुरू होत नव्हते. महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, मार्गदर्शक संजय भगत, गजानन वाघमारे,विनोद कोपरकर,उपाध्यक्ष मोहन पांढरे, सुनील चव्हाण, अमोल राजवाडे,रियाज पारेख,रवी वाघमारे,गजानन साबळे, तसलीम शेख, शैलेश वानखेडे,भगवान फाळके,गजानन बोक्से, सदानंद लाहेवार,गजानन दरोडे,ओमप्रकाश देशमुख, उमेश गाडे,मनोज सुरोशे, नंदकुमार कावळे,सुधीर देशमुख,मारोतराव देशमुख, संजय कोपरकर,पवन रावते,मंचक गोरे,नरेंद्र नप्ते,डॉ.अशोक राऊत, किशोर राऊत,भैय्यासाहेब पाईकराव,फराज पठाण, धम्मानंद कावळे व महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या तत्कालिक सर्व पत्रकार बांधवांनी ग्रामीण रुग्णालयासाठी लढा उभारला होता.चौकट पांडुरंग वानखेडे उपचार घेणारे पहिले रुग्ण.महागाव येथील पांडुरंग दिगंबर वानखेडे हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे पहिले रुग्ण ठरले. डॉक्टरांच्या चमुने सुरुवातीला त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


