प्रतिनिधी: भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर,डहाणू- महाराष्ट्र ग्राम जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने डहाणू तालुक्यातील सर्व संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांना सिंचन आवर्तन बंद ठेवण्याची सूचना दिली आहे. हा निर्णय क्षेत्रीय सिंचन सुधारणा प्रकल्पाच्या कामांसाठी घेतला गेला असून, यासाठी १५ डिसेंबर २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत सिंचन आवर्तन बंद ठेवण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, दुबार शेतीमधून अतिरिक्त उत्पन्न घेण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र, सिंचन पाणी उपलब्ध न राहिल्याने पीक घेणे कठीण होणार आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उपविभागीय अभियंता श्री. एस.एस. सरगन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुदाम कृष्णा मेरे (शेतकरी):
“सिंचन आवर्तन बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी दुबार पिकावर अवलंबून होतो. परंतु, या निर्णयामुळे माझे खूप मोठे नुकसान होणार आहे.”