मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना शहरात तीन पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला परळी शहर पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराला वेग आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष असून त्यांच्या कारवाया सुरू आहेत. पोलिसांना एका तरुणाकडे काही पिस्टल आणि जिवंत काडतुसे असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता परळी शहर पोलीसांनी तात्काळ धाव घेत जुन्या परळी मधील गणेश पार भागात असलेल्या काळरात्री देवी मंदिराच्या पाठीमागे एक ३० वर्षीय युवक तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे बाळगून असल्याची माहिती वरून परळी शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तीन पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे आढळून आली. ज्याची अंदाजीत किंमत ०१ लाख ५६ हजार रुपये एवढी आहे. वैभव रोहिदास घोडके वय ३० वर्षे रा. भिम नगर परळी असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू सानप यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुर नंबर १६४/२०२४ कलम ३/२५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर लोकांना पिस्टल सारखे घातक शस्त्र मिळतातच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.