शिवाजी पवळ
शहर प्रतिनिधी श्रीगोंदा
ओंकार ग्रुप संचालित श्रीगोंदा तालुक्यातील गौरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड हिरडगाव व देवदैठण येथील दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून १३ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आमचे उद्दिष्ट असून चालू गाळप हंगामात आलेल्या उसाच्या बिलापोटी मागीलवर्षी प्रमाणेच जिल्ह्यात उच्चांकी भाव देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही गौरी शुगर साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
श्री. बोत्रे पाटील पुढे बोलताना म्हणाले की माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी या ठिकाणी साखर कारखाना उभा करून येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात काय अडचणी आल्या हे मला माहीत नाही असे सांगून आ. पाचपुते यांनी अद्यावत कारखाना उभा केला व तो मी चालवण्याचं काम करत आहे. ओंकार ग्रुपच्या या कारखान्यावर नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मी घेत असून गौरी शुगरतर्फे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप योजना आणली आहे. आमच्या आधीच्या आठ साखर कारखान्यांवर आम्ही ही योजना कायमस्वरूपी राबवत असून गौरी शुगरला देखील या पुढील कालखंडात मी चेअरमन आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे असे ठाम प्रतिपादन श्री.बोत्रे पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना श्री. बोत्रे पाटील यांनी सांगितले की गेला गळीत हंगाम आमच्यासाठी नवीन होता तरीदेखील येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले. या हंगामात मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री तयार आहे सुमारे १४ हजार हेक्टर उसाच्या नोंदी आमच्याकडे तयार आहेत. एकाही शेतकऱ्याचं टिपरू शिल्लक राहणार नाही याची हमी आम्ही घेत आहोत मात्र एकाच दिवशी सगळ्यांचा ऊस गाळप होणार नाही शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आम्ही राज्यात नऊ कारखाने चालवत आहोत प्रत्येक कारखान्यावर शेतकऱ्यांना जेवढे देता येईल तेवढा प्रयत्न पूर्वी होता आताही राहील मात्र शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका जर घेतली तरच शेतकऱ्यांना न्याय देता येईल असेही ते म्हणाले.
चौकट : आमची कोणाशीही स्पर्धा नाही शेतकऱ्यांना देता येईल तेवढे देऊ हा भाव देताना येथील प्रशासनाने चांगले काम केले त्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय देता आला याचा मला अभिमान आहे – श्री. बाबुराव बोत्रे पाटील.