निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात भिवंडी ग्रामीणचे शिवसेना(उबाठा) उमेदवार महादेव घाटाळ यांचे आवाहन…
दिपेश पष्टे ग्रामीण प्रतिनिधी, वाडा
भिवंडी ग्रामीण शिवसेना (उबाठा) पक्षाचा वाडा तालुका निष्ठावंत शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा वाड्यातील स्नेह गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. शिवसेना फुटीनंतर भिवंडी ग्रामीण मतदार संभ्रमात असताना पुन्हा एकदा शिवसेना(उबाठा) पक्षाकडून नुकताच प्रवेश झालेले महादेव घाटाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. लगेचच घाटाळ यांनी मतदार संघात मोर्चे बांधणी सुरू केली. यावेळी भागातील रस्त्याच्या प्रश्नाला हात घालून जनतेची असलेली समस्या सोडवण्याचा निर्धार केला तर मागील “दहा वर्षात जी विकासकामे रखडली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करून घराघरात पोहचून मतदान करा”, असे आवाहन शिवसैनिकांना घाटाळ यांनी केले. काही महिन्यांपूर्वी पक्षात अंतर्गत गटबाजी झाली ती शमवण्याचे काम आम्ही नक्कीच करू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष विश्वास थळे यांनी व्यक्त केला. तर “आरक्षण संदर्भात आमच्यावर अन्याय होतो, निष्ठावंत शिवसैनिकांना विविध उपक्रमांमध्ये डावलले जाते असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही पक्षाचे निष्ठेने काम करू”, असा आवाज उपस्थित शिवसैनिकांनी केला.यावेळी शिवसेना पक्षातील असंख्य निष्ठावंत शिवसैनिक, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, बूथ प्रमुख उपस्थित होते.


