अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी,डहाणू
पालघर जिल्ह्यातील युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपने विविध सामाजिक उपक्रमांची सुरूवात करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अरविंद बेंडगा यांच्या नेतृत्वाखाली डहाणू तालुक्यातून या उपक्रमाला गती मिळत असून, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, कुपोषण, स्वच्छता, आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.युवा परिवर्तन फाउंडेशनची सुरुवात एका साध्या व्हाट्सअप ग्रुपमधून झाली, पण आता ते एक सक्रिय सामाजिक संस्थेचे रूप घेऊन कार्यरत आहे. जिल्ह्यातील विविध गावांतील तरुण एकत्र येऊन गरजूंना पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, मतदान ओळखपत्र काढून देणे आणि विविध सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वरोजगार उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे,जिल्ह्यातील 700 नवतरुणांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा केली आणि पुढील कार्ययोजना ठरवली. पथनाट्य सादरीकरण, स्वच्छता मोहीमा, तसेच घराघरात जाऊन प्रबोधन करण्याच्या उद्दिष्टाने हा ग्रुप कार्यरत राहणार आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील लोकांपर्यंत या उपक्रमाचा प्रभाव लवकरच पोहोचेल.
युवा परिवर्तन फाउंडेशन हा तरुणाईला एकत्र करून समाजात परिवर्तन घडवणारा एक महत्वपूर्ण ठरत आहे.