सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा ता. २३ : दिवाळीचा सण अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत घराला प्रकाशमय करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या पारंपरिक पणत्यांसह विविध प्रकारचे आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. घरांवर विद्युत रोशणाई करण्यासाठी लायटिंग, रांगोळ्यांसाठी लागणारे विविध रंग, विद्युत तोरणे आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. भारतीय संस्कृतीमधील सर्वांत मोठ्या सणासाठी जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी आळेफाटा बाजारपेठही सज्ज झाली असून, दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी हळूहळू वाढत आहे.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार या सणाचा आनंद घेतो. अशा या प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी सर्वचजण आतुर असतात. घराला रंगरंगोटी, नवे कपडे, रोशणाई, फराळ, रांगोळी, फटाके आणि नवीन वस्तूंची खरेदी, अशा नाना प्रकारच्या वैशिष्ट्यांनी सामावलेली दीपावली अगदी चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी खरेदीला सुरुवात झाली असून, बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे.
दिवाळीच्या सणाला दिव्यांचे आणि रोशणाईचे महत्त्व असते. त्यामुळे बाजारात साध्या पणतीपासून ते नक्षीदार पणत्या उपलब्ध आहेत. आकाशकंदील आणि विविध आकार, प्रकाराच्या दीपमाळांनी दुकाने सजली आहेत. त्याचबरोबर धूपदाणी, लक्ष्मी, गणेशकंदील, हँगिंग लॅम्प, घंटीवाले झुंबर, कासवातील पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत. पणती खरेदीबरोबरच शहरातील मुख्य बाजारपेठांमध्येही विविध आकारातील आणि प्रकारातील आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्लास्टिक, कापडी यांसारख्या विविध प्रकारातील कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कमळ, चांदणी, स्टार, फायर बॉल, कारंजी, अनार लोटस यांसारखे विविध प्लास्टिक कंदील प्रकार दिसत आहेत. दिवाळी म्हटले की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत फटाके उडविण्याचा मोह आवरत नाही. सर्वत्रच मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते. यासाठी बाजारात फटाक्यांची दुकाने लागली आहेत. दरवर्षी जे फटाके असतात, त्याबरोबरच यंदा फटाक्यांमध्ये आवाज कमी, पण आकर्षकता जास्त’ असणारे फटाके विक्रीला आले आहेत.