दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा (प्रतिनिधी) : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात गत पाच वर्षात आपण बाराशे कोटींची विकासाची कामे केली असून जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीने आपणांस पुनश्च संधी दिली आहे. मतदार संघातील उर्वरित कामे पाच वर्षात पूर्णत्वास नेणार, असा विश्वास शहादा मतदार संघाच्या भाजपाचे उमेदवार आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला. भाजपा महायुतीच्या वतीने त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य दीपकभाई पाटील, प्रवाशी नेता मुकेश राठवा, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, रोहनकुमार माळी, सागर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.पाडवी म्हणाले, गत पाच वर्षात आपण मतदार संघात रस्ते, वीज, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रातील समस्या सोडवत विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. शहादा व तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष व महायुतीने माझ्यावर विश्वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली असून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झालो आहे. आ.पाडवी पुढे म्हणाले की, गतवेळी मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला विजयी केले होते. पाच वर्षात शहादा-तळोदा मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. शहरी भागातही विविध सुविधा पुरविल्या आहेत. शहादा शहराच्या हद्द वाढ मंजुरीसाठी मी प्रयत्न केला मात्र प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तरी पालिका हद्दीबाहेरील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते आदींच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाच वर्षात सर्वच क्षेत्रात विकासाची कामे केली आहेत. परिसराचे भाग्यविधाते स्वर्गीय अण्णासाहेब पी.के पाटील यांनी सिंचन, शैक्षणिक क्षेत्रात जी क्रांती केली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करत आहे. राहट्यावड धरणासह सिंचनाचा प्रश्न सोडवला जाणार आहे. गोमाई नदीवर बंधारे बांधल्यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. दोनशे कोटींचे मिनी बॅरेज बांधण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे मतदार संघातील शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. राहट्यावड धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार. महायुती सरकारने अतिशय गतिशील निर्णय घेत शेतकऱ्यांच्या किसान सन्मान योजनेत निधीची वाढ केली आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले आहेत. शेतक-यांचे विज बिल माफ केले जाणार आहेत. सौर ऊर्जेचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसोबत कामगारांचा उत्कर्ष करण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांना कीट वाटप केले गेले आहेत. मतदार संघात सत्तर हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. कल्याणकारी योजना मतदारसंघात राबवल्या आहेत म्हणून जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे तसेच राज्यात विकासात्मक कामे केल्याने पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे असेही त्यांनी सांगितले.