सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
डहाणू तालुक्यातील फणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला कुंढारे परिवाराने ५० लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण यंत्र त्यांची दिवंगत मुलगी श्रध्दा हिच्या स्मरणार्थ भेट दिले. श्रध्दाचे वयाच्या १२ व्या वर्षी निधन झाले होते. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ कुंढारे परिवार गेल्या सात वर्षांपासून श्रध्दाचा वाढदिवस १७ ऑक्टोबरला वेगवेगळ्या शाळांना ५० लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण यंत्र भेट देऊन साजरा करतात. मागील वर्षी निकणे घाटाळपाडा येथे देण्यात आले होते. तर या वर्षी श्रध्दाचे आई-वडील जयश्री आणि कुमार कुंढारे यांनी फणसवाडी शाळेला भेट देत, तिच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात श्रध्दाचे आजोबा यांनी तिच्या गुणांचे वर्णन आणि आजारपणाची कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली, ज्यामुळे सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले. निलेश डोंगरे, प्रताप अंडील आणि गणेश पवार यांनी शाळेला जलशुध्दीकरण यंत्राची आवश्यकता असल्याचे सांगितले होते श्रध्दाला हयात असताना सामाजिक कार्याची प्रेरणा कशी मिळाली याची माहिती तिचे वडील कुमार कुंढारे यांनी दिली. यावेळी संजीव सावकारे, रमेश महाले, रफिक शेख उपस्थित होते. कुंढारे परिवाराच्या या कार्यामुळे श्रध्दाच्या स्मृतींना उजाळा मिळतोच, पण समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळते आहे.


