सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या हद्दीत विजयवाडी येथे १५ ऑक्टोबरच्या रात्री बिबट्याने घरा जवळ बांधलेल्या बकरीची शिकार केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोर्डी वनक्षेत्रपाल आर. एस. सारणीकर यांच्या नेतृत्वाखाली पंचनामा करून बिबट्याचा माग काढण्यासाठी ३ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.चिखले आणि घोलवड गावातील शेतकरी वर्गात बिबट्याच्या दहशतीमुळे भीती पसरली आहे. १५ ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मी आरदोरी या महिला शेतकऱ्याच्या शिवारातील झोपडी नजिकच्या गोठ्यातील दोन बकऱ्या गायब झाल्या. यापैकी एका बकरीवर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याचे वन परिक्षेत्रपाल सारणीकर यांनी सांगितले. याबाबत पंचनामा करण्यात आला असून, नुकसानीची भरपाई एक महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.परिसरातील एका शेतात बिबट्याचे ठसे आढळले असले तरी, लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचा ठावठिकाणा मिळालेला नाही. दरम्यान, भात कापणी हंगामाला सुरुवात झाली असून, परिसरात चिकू बागायती असल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच, गस्ती पथकाची नेमणूक करण्यात आली असून, कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ वन विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेची पाहणी करण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी, वनपाल प्रणव भोई, वाईल्डलाईफ कंन्झरव्हेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य प्रतीक वाहूरवाघ, रेमंड डिसोझा, सागर पटेल, एरिक ताडवाला आणि घोलवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.


