कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदूरबार:तळोदा शहर व परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून ढगाचा गडगडासह व विजेचा कडकडासह जोरदार पावसाला सुरवात झाली. याचा परिणाम शहरातील नावाजलेली शाळा नेमसुशिल विद्यामंदिरवर देखील झाला.संपूर्ण शाळेत पाणी साचले असून पाण्याच्या निचरा होण्याची कोणतीही सुविधा शाळेकडे नाही त्यामुळे शालेय प्रशासन हे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे अशी भावना पालकांमध्ये निर्माण होत आहे. तळोदा शहरातील विद्येचे मंदिर नेमसुशील शाळेला पावसाने अक्षरशः झोडपून टाकले. पावसाच्या पाण्याच्या थैमानाने विद्यार्थ्यांच्या वर्गांमध्ये पाणी साचले असून शाळेच्या परिसरात पाण्याच्या तलाव भरला असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेत येजा करण्यासाठी अडथळा होत आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा यक्ष प्रश्न उभा राहत आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना वेठीस धरून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक फी गोळा करून देखील विद्यार्थ्यांना हव्या तशा सुविधा पुरविण्यात शालेय प्रशासन कानाडोळा करत आहे.पावसाचे पाणी शालेय मैदानातच नाही तर वर्गाखोल्यात पण शिरले आहे. विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.मागील महिन्यात झालेल्या पावसात देखील शाळेत पाणी शिरले होते. तेव्हाच काही उपाय योजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती.पण कोणतीही उपाययोजना न करता शाळेचे पदाधिकारी व चेअरमन झोपी गेले आहे अशी भावना पालकांमध्ये निर्माण होत आहे.पालकांनी जाब विचारला असता व पाहणीसाठी शाळेत गेले असता पालकांना शाळेत प्रवेश दिला नाही.शाळेतील कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी माहिती संकलित करू दिली नाही.त्यामुळे शालेय प्रशासन मनमानी कारभार चालवत आहे यावर शिक्कामोर्बत होताना दिसून येत आहे.