दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा (प्रतिनिधी) : तळोदा येथील पंचायत समितीचे ग्रामीण गृह निर्माणचे कंत्राटी अभियंता निलेश प्रकाश पाटील (वय 27 वर्षे) यास दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. शबरी आवास योजनेचे चौथा हप्ता देण्यासाठी ही रक्कम घेण्यात आली. शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले होते. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती येथून प्राप्त झाले आहेत. परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी होते. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी पंचायत समितीचे ग्रामीण गृह निर्माणचे कंत्राटी अभियंता निलेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निलेश प्रकाश पाटील याने तक्रारदारकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या अनुषंगाने पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सापळा अधिकारी श्रीमती नेहा सूर्यवंशी, पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी, पोहवालदार विजय ठाकरे देवराम गावित, कार्यवाही मदत पथक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, हवालदार विलास पाटील, संदीप खंडारे, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, हेमंत महाले, जितेंद्र महाले आदींनी परिश्रम घेतले.