विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ :उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मतदारसंघात ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाविक भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते आजपर्यंत मोठी अतिवृष्टी झाली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आला आहे. या पावसाने शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. सोयाबिन, तूर, हळद, कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागातील अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची घरे पडली असून संसार उघड्यावर आला आहे. काहींच्या दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मूकी जनावरे वाहून गेले आहेत. उभी पिके वाहून गेली असल्याने हाता तोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे. जमिनी खरडून गेल्याने पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन गावांना जोडणारा नदी नाल्यावरील पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आपण जिल्हा प्रशासनाला तालुका प्रशासनाला आदेश देऊन तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी भाविक भगत यांनी केली आहे.