संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
भिगवण ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर दुरुस्तीच्या कामात होणारा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होण्या अगोदरच रोकण्यात आल्याची माहिती शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजीत जाधव यांनी दिली.तर जाधव यांच्या जागरूकते मुळे शासनाची ५ लाख ७४ हजार रुपयांची बचत झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर काही दिवसापासून बंद होता.मुळातच हा जनरेटर नवीन बसविताच ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे नादुरुस्त झाला होता.याला असणारी वॉरनटी चालू न करताच संपूनही गेली होती. ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी आणि जनरेटर दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी शिवतेज ग्रुप ,मराठा महासंघ आणि अमर बौद्ध युवक संघटनेच्या माधयामातून मोर्चाचे आयोजन करून आंदोलन ही करण्यात आले होते.या आंदोलना नंतरही शासनाने वेळ काढू पणा दाखविल्या मुळे आंदोलकांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडून आंदोलन चालू ठेवले होते.याची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यामुळे तक्रारवाडी मदनवाडी आणि भिगवण येथील व्यापारी वर्गाने आंदोलनाला पाठींबा दर्शवित आपले व्यवहार बंद ठेवले होते.यावेळी आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.तर याच वेळी जनरेटर दुरुस्ती साठी ६२१४२४ इतका खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे दिला असल्याचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नागनाथ एम्पल्ले यांनी आंदोलकांना दिले होते.यावर जनरेटर दुरुस्ती साठी इतका खर्च येणे शक्य नसल्याचे रणजीत जाधव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुढे होत सम्राट मोटार गॅरेज च्या नवनाथ (बुवा ) खंडागळे यांच्याशी संपर्क साधून दुरुस्ती करण्यास सुरवात केली.आणि काय आश्चर्य ६ लाखाचे काम फक्त ४७ हजार रुपयात पूर्ण झाले.इतकच काय तर जनरेटर अगदी सुंदर रीतीने आपले काम हि करू लागला.त्यामुळे शासनाच्या ५ लाख ७४ हजार ४२४ रुपयाची बचत झाली.त्यामुळे शासनाची होणारी फसवणूक टाळली गेली आहे.याबाबत खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनरेटर दुरुस्ती चांगल्याप्रकारे झाली असून आता यात काही बिघाड होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. तर ६ लाखाचे काम ५० हजारात होवूनही शासकीय अधिकारी हे काम वरच्यावर झाले आहे असे खंडागळे यांनाच बोलत असून मुख्य काम करावेच लागणार असल्याचे सांगत असल्यामुळे यातील गोलमाल काय आहे हे समजण्यास मार्ग नाही.तर शासनाला हे काम वरच्यावर का करता आले नाही असा सवाल आंदोलक विचारीत आहेत.याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रभारी अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी पदभार सोडला असल्याची माहिती मिळाली.तर तात्पुरता पदभार असणारे डॉ.अनिकेत लोखंडे ट्रेनिंग साठी नागपूर येथे गेल्याची माहिती मिळाली.


