देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
दरवर्षी युवा वर्ग शिक्षण पूर्ण करून मोठ्या संख्येने नोकरी,व्यवसाय यांच्या शोधात असतो.अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी येतात.दुसरीकडे अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत होते.मात्र,राज्य शासनाच्या“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनें”अंतर्गत नोकरी इच्छुक उमेदवारांना शासकीय कार्यालय/खाजगी आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणद्वारे विद्यावेतनासह अनुभवाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबवली जात आहे.या योजनेची लाभार्थी तेजस्विनी कुलथे म्हणाली,माझे शिक्षण बी.कॉम.जी.डी.सी.ए. झाले आहे.मला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कौशल्य,रोजगार,उद्योजकता विकास व मार्गदर्शन केंद्रात संधी लाभली आहे,त्यासाठी मला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होते.पण,अनुभवाअभावी नोकरी मिळत नव्हती.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून शासकीय कामकाज पाहण्याची,त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या अनुभवाचा फायदा भविष्यात नक्की होईल.या विद्यावेतनाचा उपयोग पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या शोधार्थ होईल,असे ती म्हणाली.योजनेची आणखी एक लाभार्थी सुमय्या शेख म्हणाली,माझे शिक्षण एम.कॉम झाले आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मला कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास व मार्गदर्शन केंद्रात शिकाऊ उमेदवारी मिळाली आहे.त्यासाठी मासिक विद्यावेतनही मिळत आहे.यासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे. काय आहे योजना?या योजनेंतर्गत www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/महामंडळ इ.कार्यालये जोडली जातील.रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल.तसेच, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.पात्रता पुढीलप्रमाणे–उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी.मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.उमेदवाराची आधार नोंदणी असावी.उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.बारावी,आय.टी.आय,पदविका,पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार आणि शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/महामंडळ इ.कार्यालय तसेच विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स,विविध आस्थापना इ.विभाग www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.सदर नोंदणी पश्चात उमेदवारांनी त्यांचे लॉगइनद्वारे संबंधित आस्थापनेने अधिसूचित केलेल्या रिक्त पदांकरिता ऑनलाईन अॅप्लाय करावयाचे आहे.याकरिता आयटीआय,सिव्हील/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री/ए.एन.एम./जी.एन.एम/डी.फार्मसी/डी.एम.एल.टी,पदवीधर/पदव्युत्तर, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन तसेच MSCIT शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत.सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत बारावी – रु.६०००/-, आय.टी.आय, पदविका – रु.८०००/-, पदवी / पदव्युत्तर- रु. १००००/- इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जना करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल,अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे.