स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : साने गुरुजी 125 अभियान अंतर्गत एस एम सोशालिस्ट फाउंडेशन पुणे तर्फे आयोजित श्यामची आई वाचन आकलन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत 4000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला, स्पर्धेत एकूण दोन परीक्षा घेण्यात येऊन त्यातून अंतिम 50 विजेते ठरवण्यात आले, या विजेत्यांचा बक्षीस वितरण व सन्मान सोहळा दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी एस एम सोशालिस्ट फाउंडेशन सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साथी सुभाष लोमटे – (विश्वस्त सचिव एस एम सोशालिस्ट फाउंडेशन ) यांनी भूषवले, प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मा.डॉ. नितीन करीर (निवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य) आणि मा. प्रमोद निगुडकर (अध्यक्ष, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर हे मान्यवर उपस्थित होते, त्याचसोबत प्रमुख मार्गदर्शक म्हणून साथी सुभाष वारे (विश्वस्त ,एस एम सोशालिस्ट फाउंडेशन पुणे) हे उपस्थित होते, याचसोबत व्यवस्थापक श्री राहुल भोसले व श्री किरण पाटील उपस्थित होते, या कार्यक्रमाला बक्षीसपात्र 50 स्पर्धक व त्यांचे नातेवाईक मिळून राज्यभरातून 120 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. पहिल्या सत्रात सौ. श्रद्धा शशिकांत दंडिले, दिपक ठाकरे सर, सानवी प्रशांत देशपांडे, सौ. वंदना गजानन मानकर, सौ . अर्चना कापडणीस, भाग्यश्री दत्तात्रेय पगारे, भार्गवी प्रशांत देशपांडे, ज्योती दत्तात्रेय पगारे व विष्णू ढेबे सर यांनी अनुभव कथन केले. व प्रमुख मार्गदर्शक साथी सुभाष वारे सर यांनी आपल्या गोड वाणीने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत मार्गदर्शन केले. कार्क्रमाच्या दुसऱ्या सत्रात सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व शाल, गुलाबपुष्प, सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सानवी प्रशांत देशपांडे व दिपक ठाकरे सर यांनी सर्व स्पर्धकांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्रमोद निगुडकर (अध्यक्ष, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर) यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करून वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले. याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मा.डॉ. नितीन करीर (निवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य) यांनी आपले अनुभव कथन करून उपस्थित सर्वांना आपल्या मार्गदर्शनाने प्रेरित केले, आणि यानंतर सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी सुभाष लोमटे यांनी सहजसोप्या पद्धतीने आपले अनमोल विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साथी उपेंद्र टण्णू यांनी केले. व साथी सोपान बंदावणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता शाहिर प्रा. तुळशीराम जाधव यांनी गायलेल्या आता उठवू सारे रान या गाण्याने व राष्ट्रगीताने झाली.