दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 19 : शहादा तालुक्यात 16 जुलैला ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यातच वकी नदीला आलेल्या पुराच्या तीव्र प्रवाहामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत असलेला वैजाली-नांदर्डे या गावांना जोडणारा पूल अखेर कोसळला. या मार्गावरील वाहतूक वेळीच बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. पूल पडल्याने परिसरातील गावांना जाण्यासाठी आता मोठा फेरा मारून जावे लागणार आहे. प्रशासनाने तातडीने नवीन पुलाला मंजुरी देऊन या मार्गावरील वाहतुकीची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वैजाली व नांदर्डे या गावांना जोडण्यासाठी एकमेव रस्ता आहे. दोन्ही गावांच्या मध्ये वाहणाऱ्या वाकी नदीवर 30 वर्षांपूर्वी पाच गाळ्यांचा पूल बांधण्यात आला होता. या पुलामुळे शहादा व तळोदा तालुक्यातील सुमारे 50 गावांचा संपर्क एकमेकांशी होता. परंतु दोन वर्षांपासून हा पूलाची जिर्णवस्थ होत पुल जीर्ण झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. एसटी बस वाहतूक दोन वर्षांपासून बंद होती. मात्र, व्यापाऱ्यांची अवजड वाहने या पुलावरून सुरू होती. हा पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधावा अशी मागणी करण्यात येत होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर 16 जुलैला सातपुड्यात व शहादा तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या जोरदार पावसामुळे वाकी नदीला पूर आला. 17 जुलैला रात्रीच्या सुमारास या पुराच्या पाण्यात पूल कोसळला. गेल्या काही दिवसांपासून पुलाची अवस्था पाहता या पुलावरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे पूल पडला त्यावेळी मोठी दुर्घटना टळली. दोन वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी किंवा नवीन पुल व्हावा अशी लेखी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला जावे लागणार आहे. बुधवारी सकाळी वाकी नदीला पूर आला होता तेव्हा पुराच्या तीव्र प्रवाहामुळे पुलाच्या पिलरचे फाउंडेशन पूर्णतः वाहून गेले होते. पूल आधांतरित होता. केव्हाही कोसळू शकतो अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजता पुन्हा नदीला पाणी वाढल्याने पुलाचे सर्व पिलर तुटून कोसळले. त्यामुळे मोठा आवाज झाला. परिणामी दोन्ही गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. परिसरातील नांदर्डे, करणखेडा, खरवड, मोड, बोरद, तऱ्हावद, खेडले, धानोरा, कढेल, उमरी, गुंजाळी, तळवे, आमलाड, कळमसरे, मोहिदा, सलसाडी तसेच सातपुडा पर्वत रांगेतील गावांच्या लोकांचे तसेच शालेय विद्यार्थी व्यापारी नोकरवर्ग यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार असून वाकी नदीवरील या पुलाचे नवीन बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. यापूर्वी मंत्री,आमदार खासदार संबधित विभाग यांना परिसरातील नागरिकांनी अनेक निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.