दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 15: राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मिय ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे राज्य सरकारने घोषीत केले आहे. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेत खान्देशातील प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव तीर्थस्थळाला स्थान दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशातील 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीच्या दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या विघ्नेश्वर, निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वरचे शिव, मुक्तीधाम, सप्तशृंगी, काळाराम, मांगीतुंगी, गजपंथ तर नगरच्या साईबाबा, सिद्धीविनायक, शनीशिंगणापूर, भगवानगड या तिर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. शेजारच्या बुलढाण्यातील शेगावच्या मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत खानदेशातील भाविकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेले पद्मालय आणि प्रकाशा या तिर्थस्थळांचा समावेशाची अपेक्षित असताना त्यांना वगळण्यात आले आहे. ‘दक्षिण काशी’ला वगळले…नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदी काठावर वसलेले प्रकाशा हे तीर्थक्षेत्र पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. महर्षी गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रकाशात दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणीचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो. येथे केदारेश्वर महादेव सोबत पुष्पदंतेश्र्वर महादेवाचे मंदिर आहे. जे काशी (उत्तर प्रदेश) येथे नाही. त्यामुळे प्रकाशा हे दक्षिण काशी (प्रति काशी) तिर्थस्थळ म्हणून प्रख्यात आहे. उत्तर काशीएवढेच दक्षिण काशीला महत्व आहे. खान्देशसह जिल्ह्याच्या सीमा लगत असलेले तापी, नर्मदा व सुरत जिल्हा (सर्व गुजरात) आणि पानसेमल (मध्यप्रदेश) तालुक्यातील भाविक चारधाम यात्रा केल्यानंतर प्रकाशा येथे दर्शनासाठी आवर्जून येतात. येथील तापी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केल्यानंतर केदारेश्वर आणि पुष्पदंतेश्र्वर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा सफल होत नसल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आजही आहे. म्हणूनच खानदेशसह दक्षिण गुजरात आणि दक्षिण मध्यप्रदेशातील भाविकांसाठी हे तिर्थस्थळ श्रद्धास्थान ठरले आहे. या प्रति काशीचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. या संदर्भात केदारेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील यांनी सांगितले की, दक्षिण काशी म्हणून ख्यातनाम असलेले प्रकाशा तीर्थस्थळ ब वर्गात आहे. मात्र, राज्य शासनास सर्वच घटकांचे तीर्थस्थळाकडे दुर्लक्ष आहे. राज्य शासनाने प्रकाशाचा समावेश योजनेत करायला हवा होता. तीर्थस्थळांची नावे पाहिल्यानंतर प्रकाशेकर नाराज झाले आहेत. मात्र भाविकांसाठी राज्य शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.