दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 15: शहादा तालुक्यातील गणोर येथील दिलीप दामू मोरे यांचा सुसरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होते. आमदार राजेश पाडवी यांनी मृत दिलीप मोरे यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीचा 4 लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी सुसरी नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी झाल्याने 06 जुलै रोजी सुसरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात गणोर येथील दिलीप दामू मोरे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. आमदार पाडवी यांनी याबाबत शासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीतून मयत मोरे यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मंजूर केली. सदरच्या मदतीचा धनादेश आमदार पाडवी यांच्या हस्ते काल 14 जुलै रोजी मयताची पत्नी ईजाबाई दिलीप मोरे मुलगी रितीका दिलीप मोरे, मुलगा श्याम दिलीप मोरे व लखन दिलीप मोरे तसेच वडील दामू आठ्या मोरे या कुटुंबियांकडे आमदार पाडवी यांनी सुपूर्द केला. यावेळी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य संजय भामरे, माजी पंचायत समिती सदस्य लगान पावरा, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते छोटू शिंदे, पिंपर्डाचे सरपंच राहुल रावताळे, उपसंरपच घनश्याम मराठे, नामदेव वळवी, प्रमोद भामरे, अर्जुन पावरा, माजी सरपंच विठ्ठल ठाकरे, गोपाल पावरा, प्रविण वळवी आदी उपस्थित होते.