गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव : शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगावचे बालाजी उत्तरवार, दुय्यम निबंधक यांनी रजिस्ट्री करण्यासाठी १.९९,०००/- रु. नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी करून तडजोडी अंती १ लक्ष ९५ हजार रुपये ठरवून, सदरील रक्कम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू (मुद्रांक विक्रेता / खाजगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगितली याची खात्री पटल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पुराव्यास अटक केली आहे. या लाचखोर दुय्यम निबंधक सह त्याच्या सहकार्यावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी दुय्यम निबंधक उत्तरवार हे हदगाव येथे कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर काही भूमाफियांनी आपल्या स्वार्थासाठी राजकिय वजन वापरून पुन्हा हदगाव येथे आणले आहे. एकूणच सर्व प्रकार पाहता उत्तरवार यांच्यामाध्यमातून झालेल्या रजिस्ट्री कारभाराची चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत रजिस्ट्री केल्याचे उघड होईल असे जनतेतून बोलले जाते आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी मौ. हदगाव येथील गट क्रमांक २५६/२ मध्ये २० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. दि. ०८/०७/२०२४ रोजी तक्रारदार नमुद शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगाव येथे जावून लोकसेवक उत्तरवार, दुय्यम निबंधक यांना भेटले टले असता त्यांनी रजिस्ट्री करण्यासाठी १.९९,०००/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली. नमुद शेतीचे रजिस्ट्री करिता लोकसेवक मागत असलेले १.९९.०००/- रु. नोंदणी व मुद्रांक फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारदार यांची खात्री झाली व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. १२/०७/ २०२४ रोजी याबाबत तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपी क्र. १) बालाजी उत्तरवार यांनी तक्रारदार यांना नमुद शेतीच्या रजिस्ट्री करिता नोंदणी व मुद्रांक फी सह असे म्हणून पंचासमक्ष १,९९,०००/- रूपयाची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी नमुद रक्कम कमी करण्यास विनंती केली असता लोकसेवक यांनी ४,०००/- रु. कमी द्या, असे म्हणून तडजोडी अंती १,९५,०००/ – रु. लाचेची मागणी करून लाच रक्कम आरोपी क्र. २) समीउल्ला अजमतउल्ला शेख याचेकडे देण्यास सांगितले. त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. २) समीउल्ला यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम १.९५,०००/- रु. उप निबंधक कार्यालय, हदगाव चे आवारात स्विकारून नमुद रक्कम आरोपी क्र. ३) शेख अबुबकर याचेजवळ दिली. त्यानंतर तक्रारदार यांना नोंदणी व मुद्रांक फिस भरल्याची १.१३.४००/- रु. ची पावती दिली आहे. नमुद प्रकरणात लोकसेवक उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीचे नावाखाली तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ८१,६००/- रु. लाचेची मागणी करून नमुद रक्कम आरोपी क्र. २) समीउल्ला यांचेद्वारे स्विकारली. नमुद लाच रक्कम आरोपी क्रमांक ३) यांनी स्वतःचे ताब्यात ठेवून गुन्हयास प्रोत्साहन दिले आहे. त्यावरून लाचखोर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस स्टेशन हदगाव, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे, भापोसे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र मो.क्र. ९६२३९९९९४४ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मो.क्र. ९८७०१४५९१५ यांच्या सूचनेनुसार सापळा व तपास अधिकारी प्रिती जाधव पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांचे सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीम यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ पुढील दुरध्वनी ०२४६२- २५३५१२ टोल फ्रि क्रं. १०६ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.