प्रकाशा बसस्थानकावर ग्रामस्थांचा वाहकाला घेराव….
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 12: प्रवास भाड्यासाठी सुटे २० रुपये नसल्याचे कारण दाखवित वाहकाने युवतीला अंधारातच बसमधून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार शहादा ते प्रकाशा दरम्यान घडला. या संतप्त घटनेची माहिती मिळताच प्रकाशा ग्रामस्थांनी बसस्थानकावर येत वाहकाला घेराव घातला. प्रकाशा येथील दामिनी लक्ष्मण पाटील ही तरुणी शहादा येथे शिक्षणासोबत खासगी नोकरी करते. मंगळवारी ती नियमित काम संपवून घरी येण्यासाठी निघाली. सायंकाळी साडेसहा वाजता तिला शहादा बसस्थानकातून शिरपूर आगाराची शिरपूर बडोदा (एमएच 20 बीएल 2302) बस मिळाली. बस शहादा शहराबाहेर आल्यानंतर वाहकाने दामिनी हिला तिकिटाची विचारणा केली. शहादा ते प्रकाशा दरम्यान बसचे 40 रुपये भाडे असून महिलांना 50 टक्के सवलती प्रमाणे दामिनीला 20 रुपये तिकीट भाडे देणे लागत होते. यावर तिने 100 रुपये देत तिकीट मागणी केली. परंतु सुटे नसल्याचे सांगून वाहकाने तिला अंधारातच शहादा शहराबाहेर असलेल्या खेतिया रोडवर उतरवून दिले. खेतिया रोडवरुन युवतीला कोणत्याही प्रकारचे वाहन न मिळाल्याने तिने पायी चालत बसस्थानकात परत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही अंतर चालून गेल्यावर शहादा ते नंदुरबार ही बस मिळाल्याने ती रात्री प्रकाशा येथे घरी पोहोचली. तत्पूर्वी दामिनी हिने या प्रकारची माहिती प्रकाशा येथे घरी दिली होती. त्यातून तिचे नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रकाशा बसस्थानकावर आलेल्या शिरपूर- बडोदा गाडीच्या बसचालकाला जाब विचारला. यावेळी गर्दी वाढल्यानंतर हवालदार मेहरसिंग वळवी यांनी धाव घेत ग्रामस्थांना शांत करीत असतानाच बस बडोद्याकडे मार्गस्थ झाली. या प्रकारामुळे प्रकाशा ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.