आदेश जावळे तालुका प्रतिनिधी, नेवासा
नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथे काल रात्री बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रांजणगावात हनुमान मंदिरा लगत राहणारे असीफ बाबाभाई सय्यद यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाळीचे कुंपण ओलांडून रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून शेळ्यावर हल्ला केला या हल्ल्यात एक शेळी जागेवर ठार केली तर दुसऱ्या दोन शेळ्या जखमी होऊन मरण पावल्या. यामुळे सय्यद कुटुंबाचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे पहाटेच्या सुमारास आसिफ सय्यद घराबाहेर आले असता त्यांना एक शेळी मेलेली तर दुसऱ्या दोन शेळ्या जखमी अवस्थेत दिसल्या. सदर घटना गावच्या जवळ घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे तरी सदर घटनेची दखल घेऊन वनविभागाने त्वरित या परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी रांजणगाव चे सरपंच कल्पनाताई लोखंडे यांनी केली आहे तसेच इतरही शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.