दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 03 : शहादा तालुक्यातील शिरुर दिगर येथील एका घरात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातील 16 लाख 33 हजार रुपयांचे 233 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना काल (दि. 02) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर दिगर येथील रहिवासी व सातपुडा साखर कारखान्यातील कर्मचारी रविंद्र पुंजरु जाधव हे आपल्या परिवारासह रात्री एक वाजेनंतर दोन मजली घराचा खालच्या मजल्याला कुलूप लावून वरच्या झोपण्यासाठी गेले होते. सकाळी उठून खाली आले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील दुसऱ्या खोलीत असलेल्या कपाटाचे दोन्ही ड्रावर उघडे व साऱ्या वस्तू अस्तव्यस्त अवस्थेत दिसून आल्या. सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे रविंद्र जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाईकांना घडलेली घटना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ शहादा पोलिसांना घडलेली घटना सांगितली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोळी, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप राजपूत, हवालदार घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, संदीप लांडगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्याकडील ठेवलेले सोन्याचे दागिने हे त्यांची बहीण, सुनबाई व पत्नीचे असल्याचे श्री. जाधव यांनी पोलिसांना सांगितले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये मंगलपोत, अंगठ्या, बांगड्या, कानातील दागिने असा ऐवजाचा समावेश आहे. बाजार भावानुसार सदर ऐवजाची किंमत 16 लाख 33 हजार रुपये इतकी आहे. नंदुरबार येथील श्वानपथकचे हवालदार दिलीप गावित, गोकुळ गावित, पुरुषोत्तम साठे व ठसे तज्ञ संजय रामोळे घटनास्थळी दाखल झाले. त्यात श्वान एंजल याने अज्ञात चोरट्यांचा मागोवा काढण्याच्या प्रयत्न केला. तो शिरूर दिगर येथील बस स्थानकाजवळ घुटमळला. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता जवळच असलेल्या एका शेतात त्यांना चोरट्यांनी दागिन्यांचे पाकीट व प्लॅस्टिकच्या डब्या फेकल्याचे आढळून आले. त्यानंतर ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील काही ठसे घेतले आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. घटने संदर्भात रात्री उशिरा शहादा पोलीस ठाण्यात रवींद्र जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला.