दिनानाथ पाटीलतालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 23: मास्तर, त्यांना काम कमी व पगार जास्त अश्या शेलक्या शब्दांसह हेटाळणीयुक्त नजरेने बघणे हे चित्र नेहमीचे झाले आहे. समाजाला सुशिक्षित करणारा हा शिक्षक गत काही वर्षांपासून दुर्लक्षित घटक मानला गेला होता. मात्र, आताच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत याच शिक्षकांचा भाव वधारला असल्याचे दिसून येत आहे. त्याला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोन्याची नथ, पैठणी साडी, ड्रेस मटेरियल, महागडा पेन आदी भेट वस्तू म्हणून घरपोच दिले जात आहे. सध्या मतदार संघात उमेदवारांचे पेड प्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिक्षकांचे निवासस्थान शोधत भेट वस्तू टोकण म्हणून पोहचविण्याचे पवित्र कार्य करतांना दिसत आहेत. दरम्यान कोण निवडून येईल याची शाश्वती नाही. एक मात्र निश्चित की होणारा आमदार हा शिक्षक नसेल. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवतील की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. पण संस्थाचालक असलेल्या उमेदवारांच्या या धामधुमीत शिक्षकांची बल्ले बल्ले होत आहे. तसेच ही भेट वस्तू फक्त टोकण आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी आणखी काही देवू असे ऐकायला मिळते. ही वस्तुस्थिती नाशिक शिक्षक मतदार संघात सर्वदूर आहे. त्यामुळे मला आले, तुला आले का आणि कोणाचे आले अशी चर्चा ऐकायला येत आहे. सर्वच उमेदवार जुनी पेन्शन योजना मिळवून देवू असे आश्वासन देत आहेत. मात्र ते मिळाले नाही तर आम्हीसुद्धा पेन्शन घेणार नाही अशी हमी कोणीही देताना दिसत नाही. सध्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 21 उमेदवार रिंगणात आहेत. यत्वसरवधिक संस्था चालक आहेत. 26 जूनला मतदान आहे. हा मतदार संघ नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यापुरता सिमित आहे. यात फक्त माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व समकक्ष शिक्षक मतदानासाठी पात्र आहेत. राज्याच्या विधी मंडळात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक मतदार संघाची निर्मिती करण्यात आली होती. यात शिक्षकच आपल्या हक्कासाठी शिक्षकाला निवडून दिले तर प्रश्न सुयोग्य पद्धतीने मांडले जावून फलनिष्पत्ती होईल हा साधारण विचार त्यामागे होता. मात्र गत दोन निवडणुकांमध्ये शिक्षक उमेदवार मागे पडले व आर्थिक सत्ताबळावर शिक्षण संस्था चालक निवडणूक लढवीत विजयी होत असल्याचे दिसून आले. पूर्वी टीडीएफ ही शिक्षकांची संघटना जिल्हा निहाय प्राधान्य देत उमेदवार उभे करीत होती व तेच विजयी होत होते. यात सामान्य शिक्षक मतदार स्वखर्चाने त्या-त्या जिल्ह्यात प्रचार करीत असल्याचा इतिहास आहे. मात्र, काही निवडणुकांपासून टीडीएफमध्ये उभी फुट पडली असल्याचे दिसते. त्यामुळे शिक्षकांचा या संघटनेवरील विश्वास कमी होत गेला. त्यातच काही नेत्यांनी संघटनेला आपल्या परिघापुरते सिमित केल्याची चर्चा आहे. एक दोन जिल्हे वगळता अन्य प्रत्येक जिल्ह्यात टीडीएफचे उमेदवार उभे आहेत व प्रत्येक जण मीच खरा टीडीएफचा उमेदवार असल्याचे जाहीर करीत आहे. त्याचा फायदा संस्था चालकांनी घेतला असल्याचे दिसते. सन 2012च्या निवडणुकीत अपूर्व हिरे यांनी उमेदवारी करीत विजय मिळविला. त्यांच्या विजयात शिक्षकांपेक्षा आर्थिक व्यवहार अधिक श्रेष्ठ ठरला. अन् मग विजयाचे गणित असलेली ही लाट सुरू झाली. विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी काकणभर अधिकचा आर्थिक व्यवहार केला, तेही विजयासाठी आवश्यक संख्या गृहीत धरून. त्यानुसार ग्रामीण शिक्षक नजरेसमोर ठेवून राजकीय डाव आखला. त्यांना काही मोठ्या संस्था चालकांनी सक्रिय(?) सहकार्य केले. त्यांचा हा डाव विजयासाठी उपयुक्त ठरला. त्यावेळी टीडीएफचे उमेदवार मात्र तेही संस्थाचालक असलेले संदीप बेडसे पराभूत झाले. यावेळी तर अनेक संस्थाचालक उमेदवारी करीत आहेत. यातील काहींनी राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळविली आहे. मात्र शिक्षकांना टीडीएफचा अधिकृत उमेदवार किंवा पाठिंबा दिला असे सांगत आहेत. टीडीएफच्या फुटीमुळे प्रत्येक नेता त्याच्या मर्जीतील उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून चौघा उमेदवारांकडून भेट वस्तू वाटपाची खिरापत सुरू आहे. यात महागडा पेन, सोन्याची नथ (जी एक ग्रॅमची असल्याचे सांगितले गेले मात्र आहे फक्त अर्धा ग्रॅमची), पैठणी साडी, रेमंड, दिग्जाम, दिनेश या कंपन्याचे महागडे ड्रेस मटेरियलचा समावेश आहे. ही भेट वस्तू शिक्षकांचे निवासस्थान शोधून प्रत्यक्ष दिले जात आहे. त्यामुळे अनेक कॉलन्यांमध्ये नवागत पत्ता विचारताना दिसत आहेत. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. भेट वस्तू देणारा वरिष्ठांना लोकेशन टाकून वस्तू दिल्याचे कळवीत आहेत. यामुळे तुमचे बरे आहे, खूप काही मिळत आहे, आम्हाला तर विधानसभा, लोकसभे आणि पदवीधरच्या निवडणुकीत 100 ते 500 रुपयात बोळवण करण्यात येते असे उद्गार सामान्य मतदार शिक्षकांजवळ काढत आहेत. मागील दोन्ही वेळी फक्त मतदाराला महिला असेल तर पैठणी आणि पुरुष असेल तर रुपये बंद पाकीट देण्यात आले. मात्र या वेळी जरी घरातील एक मतदार असेल तरी दोघा पती पत्नींना भेट वस्तू दिली जात असल्याने गृहिणी सुद्धा या निवडणुकीत नवऱ्याचा वट वाढल्याने आणि सोन्याची नथ व पैठणी मिळाल्याने आपल्या मिस्टरवर जाम खुश आहेत. एकंदरीत शिक्षकांची या निवडणुकीत बल्ले बल्ले आहे. तसेच हे टोकण असून मतदानाच्या एक किंवा दोन दिवस अगोदर आणखीन काही तरी मिळेल असे सांगण्यात आल्याची चर्चा होत आहे. नजीकच्या काही महिन्यांनी नवीन ड्रेस घातला तर मित्र काय, कोणत्या उमेदवाराचा आहे असे सहज विनोदाने म्हणतांना दिसले तर नवल नाही. उमेदवार एकदा विजयी किंवा पराभूत झाला की नंतर सहा वर्ष परत येणार नाही हे माहीत असल्याने शिक्षण संस्था चालकांनी सर्व उमेदवार आपलेच असे मानीत प्रत्येकाला मदतीचे आश्वासन देत असल्याची चर्चा आहे. एका संस्था चालकाने तर चार प्रबळ उमेदवारांसाठी संस्थेतील चार शिक्षकांची अप्रत्यक्ष नेमणूक करीत मतदारांशी उमेदवाराच्या देण्या घेण्याचे व्यवहार करण्याचे सांगितल्याची चर्चा आहे. या सगळ्या गदारोळात शिक्षकांच्या मुळ प्रलंबित प्रश्नावर उमेदवार फक्त तोंड देखले आश्वासन देताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांची संस्थेतील काहिबशिक्षक वगळता त्यांनी कोणत्या शिक्षकांचे किती प्रश्न सोडविला असे विचारले तर त्यावर त्यांचेकडे कोणतेही उत्तर नसेल. सध्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात जुनी पेन्शन योजना, शालार्थचे प्रलंबित प्रस्ताव, 20%, 40%, 60% व 80% या टप्प्याचे रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न, आय टी शिक्षकांचा प्रश्न, वेतनेतर अनुदान, शाळा इमारत देखभाल खर्च, स्वयं अर्थ सहाय्य शाळांचा प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत भूमिका, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन पथक कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयात होत असलेले आर्थिक शोषण यावर कोणताही उमेदवार ठोस आश्वासन देताना दिसत नाही. निवडून आल्यानंतरच्या सहा वर्षांच्या कालावधीत जर शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर मी सुद्धा माझे पेन्शन घेणार नाही असे जाहीर बोलायला कोणताही उमेदवार तयार नाही. दिले तरी ते हा शब्द पळतीलाच यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही हे तेव्हढेच सत्य आहे.


