गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :-नांदुरा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्गत नालंदा नगर व तक्षशिला नगर मधील विविध विकास कामाकरिता एक कोटी ५९ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते व नाली काँक्रिटीकरण तसेच कंपाऊंड वॉल बांधकामाचा समावेश आहे.परंतु तब्बल पाच महिन्यांत कंपाऊंड वॉल व दोनशे मीटर रस्ता काँक्रिटीकरण बांधकामांव्यतीरीक्त कुठलेही बांधकाम झाले नाही.मागील दोन महिन्यांपूर्वी नालंदा नगर मधील नाली बांधकामास सुरुवात झाली होती परंतु कोठे पाल चुकचुकली माहिती नाही व बांधकाम अद्याप थंड बस्त्यात पडले आहे. कृष्णानगर मधील नाली जवळचे विद्युत खांब हटविण्यासाठी ह्याच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्ग मंजूर निधीतून खर्च करण्यात आला आहे.तर कृष्णा नगर व शक्ती नगर मधील नाली बांधकाम व रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ह्याच निधी अंतर्गत सुरू आहे . म्हणजे नालंदा नगर व तक्षशिला नगर मधील बांधकामासाठी मंजूर निधी सर्व साधारण लोक वस्तीतील विकास कामावर खर्च केल्या जात आहे. ही गंभीर बाब असून हे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा नालंदा नगर व तक्षशिला नगर मधील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशारा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मुख्याधिकारी नगरपरिषद नांदुरा यांच्यामार्फत दि.२२ मे ला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर एकूण ३४ लोकांच्या सह्या असुन निवेदन दिले त्यावेळी पत्रकार तुकाराम रोकडे, समाधान हेलोडे, भगवान वाघोदे,सुधाकर मेढे, अनुराग वानखडे इत्यादी उपस्थित होते.ठेकेदाराने पांच महिन्यानंतर लावला कामाचा फलक .ठेकेदार अमोल ठोंबरे यांना केलेल्या सूचनामुळे तब्बल पांच महिन्यानंतर तीन कामांपैकी एका कामाचा फलक लावण्यात आला आहे.तोही अर्धा इंग्रजी व अर्धा मराठीत आहे.म्हणजे नगरपालिका प्रशासन ह्या बांधकामाबाबत किती संवेदनशील आहे हे यावरून सिद्ध होते.