विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भिगवण येथील मत्स्य मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे मार्केट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापन समितीने ताबडतोब यावर उपाय योजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्याकडे दिले आहे. भिगवण मच्छी मार्केटमध्ये खराब मासे कंटेनर मध्ये भरून आणले जातात. या खराब माशाची दुर्गंधी परिसरात पसरली जाते यामुळे या परिसरात राहणाऱ्या तसेच भिगवण मेन व्यापार पेठीतील व्यापाऱ्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे वयोवृद्ध व लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भिगवण मत्स्य मार्केटमधील खराब मत्स्यव्यवसाय बंद करण्याची मागणी होत आहे याबाबत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष देवकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत आम्ही स्वच्छता केली असून औषध फवारणी केली आहे तसेच संबंधित मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.