पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरसमोरही वाहतुक विस्कळीतपी वन,पी टू पार्किंगचा प्रयोग पुन्हा सुरू करावा
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: १६ मे २०२४ परळीत वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. वाहतूक कोंडीला काही प्रमाणात का होईना आळा बसावा यासाठी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक, (तळ परीसर) राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल येथे उभारण्यात आलेले सिग्नल बंद असून, नागरिक सिग्नल बंद असल्याने नियम पाळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर परिसरातही सिग्नल बसवावेत व पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग पुन्हा सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनोज संकाये यांनी केली आहे. शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यावर उभा राहून फळ विक्री करणारे गाडीवाले (बागवान), फेरीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक व वाहन धारकांनी केलेले अतिक्रमण, वाहतूक नियमांची पायमल्ली यामुळे परळी शहरातील वाहतूक समस्या जटील बनली आहे. नागरिक जागा मिळेल तिथे दुचाकी व अन्य वाहने उभी करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ मंदिर परिसर या भागात रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तात्काळ लक्ष देवून या ठिकाणी वाहतूक सुरळीत करावी अशीही मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात सुरू करण्यात आलेला पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग सध्या बंदच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत आहेत. विशेषतः बाजारात दुचाकी वाहनांमुळे रस्ता अरुंद होत आहे. शहर वाहतूक शाखेने पाठपुरावा करून वाहतूक सिग्नल पुन्हा सुरू करावेत तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.


