स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये ३२ उमेदवार रिंगणात असून या मतदारसंघात प्रमुख गाव असलेल्या वाघोलीतील फायरब्रँड नेते तसेच नुकतेच मनसे मधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले प्रकाशभाऊ जमधडे हे देखील लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवीत आहेत. त्यामुळे आता शिरूर लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे.वाघोली परिसरातील विविध प्रश्नांवर आंदोलनातून आवाज उठवणारे प्रकाश जमधडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात मातब्बर उमेदवारांना शह देण्यासाठी शड्डू ठोकला आहे.शिरूर लोकसभेच्या एकंदरीत असणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या गावांमध्ये निर्णायक मतदान देणारे गाव म्हणून वाघोलीचे नाव आहे. ६० हजारांच्या वर मतदार असणाऱ्या वाघोलीतून जमधडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तीन टर्ममध्ये आढळराव यांचे भरीव काम नाही तर एक टर्म कोल्हे मतदार संघात फिरकले नाहीत. शिरूरच्या जनतेने दोन्ही उमेदवारांना निवडून दिल्यानंतरही मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय जमधडे यांनी घेतला आहे. मतदार संघात भेडसावणारे रस्ते, वीज, पाणी , वाहतूक व्यवस्था, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कचरा व्यस्थापन, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, मराठा आरक्षण हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जमधडे यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणिकीमध्ये प्रमुख लढत असलेल्या मातब्बर उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर असल्याने प्रत्येक गावाच्या मतदानाकडे लक्ष दिले जाणार आहे. आता मतदार जमधडे यांना निवडणुकीत किती मताधिक्य देतात हे पाहणे पुढील काळात नक्की कळेल.