गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव :- गाव पातळीवरील विविध प्रकारच्या महसुली कामे करणारी यंत्रणा म्हणून तलाठी सज्जे महत्वाची भूमिका बजावतात.महसूल विभागाचा ग्रामीण भागातील भक्कम पाया आहे. शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तलाठ्यावर अवलंबून आहे. त्यात प्रामुख्याने सातबारा उतारे ,८ अ चे उतारे ,तसेच इतर विविध दाखल्यासाठी त्यांच्याकडे जावे लागते. तसेच विविध महसुली प्रकरणे, पीक पाणी नोंदी हे त्यांच्यावरच अवलंबून असतात अशा तलाठ्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही, त्यामुळे अडचणी येतात. म्हणून शासनाने पुढाकार घेत अश्या कार्यालयाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला खरा पण प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मनाठा तेथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेत नव्याने बांधण्यात येणारे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम अतिशय थातुरमातुर पद्धतीने केले जात आहे. यात संबधित अभियंता व त्यांच्या विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने गुत्तेदार नियमाला बगल देऊन काम करत असल्याची कुजबुज गावकरी करत आहेत . मनाठा मंडळात येणारे मनाठा, सावरगाव (माळ) शिबदरा, जगापुर, तरोडा, वरवट, जांभळसावली, करमोडी, यांचा समावेश असून जवळपास याकरिता ४० लाखाचा निधी शासनाने उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यात ही तालुक्यातील अनेक साज्ज्याचे काम पूर्णत्वास आले असताना मनाठा येथील कामास कासव गतीने थातुर मातुर काम करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. तेंव्हा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.प्रतिक्रिया:- १)”अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आमच्या मागणीला यश मिळाले आहे पण हे बांधकाम दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे अशी आमची भूमिका आहे.” – श्रीमती कावळे मॅडम, मंडळ अधिकारी मनाठा २) शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे बांधकाम होणे गरजेचे आहे, इतके दिवस आम्ही भाड्याच्या खोलीत राहत होतो, आता हक्काचे कार्यालय मिळाले याचे समाधान आहे – “श्री. बेंबरकर, तलाठी मनाठा.


