स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : उत्साहात रंगलेल्या तरुणाईने रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद लुटला. सप्तरंगाची उधळण करत विविध गाणी, ढोल-ताशाच्या ठेक्यावर नाचत रंगांत अक्षरशः न्हाऊन निघाले. शहरात विविध ठिकाणी तरुणाईसह बच्चे कंपनी, वयोवृध्द नागरिकांनी एकत्रित येऊन जल्लोष केला. यात मारवाडी, उत्तर भारतीयांनी सहकुटुंब धमाल केली. यानिमित्ताने धुलिवंदनाचा सण वाघोलीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.रविवारी रात्री (ता. 24 ) होळीचा सण उत्साहात साजरा झाला. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी वाघोलीत धुलिवंदनाचे रंग खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मारवाडी समाज, उत्तर भारतीय नागरिक सकाळपासून रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये एकमेकांवर रंग उधळत धुळवड खेळली जात होती. काही ठिकाणी गाण्याच्या तालावर छोट्या कंपनीसोबत मोठ्यांनीही ताल धरला. सलग सुट्टीत धुलिवंदन आल्याने आज सकाळपासूनच वाघोलीत कमालीचे उत्साहाचे वातावरण होते.रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सकाळपासूनच धुळवडीला सुरुवात झाली होती. गल्ली, वस्त्यांमध्ये सामुहिक धुलिवंदनाचा आनंद घेतला गेला. काही ठिकाणी समूहाने एकत्रित येत एकमेकांवर रंग उधळले. पाणीटंचाईच्या स्थितीमुळे सध्या रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. सामाजिक भावनेची जाणीव ठेवत पाण्याचा वापर टाळून कोरड्या रंगांनी होळीचा सण साजरा झाला. बालगोपाळांनी केलेल्या तुरळक पाण्याच्या वापराव्यतिरिक्त तरुणाईने कुठेही पाण्याची नासाडी होऊ दिली नाही. आज धुळवड शहरात प्रचंड आनंदात आणि उत्साहात साजरी केली.—*पोलिसांनी उधळला कर्तव्याचा रंग*सर्वसामान्यांच्या आनंदात आमचा आनंद, असे सांगत लोणीकंद पोलिस दलाने आज वाघोलीत पोलिस बंदोबस्त दिला. यामुळे धुळवड उत्साहात व शांततेत झाली. एकीकडे रंगाची धुळवड उडत होती. रंगीबेरंगी चेहरे सर्वत्र हसत-खेळत फिरत होते, तर पोलिस मात्र कर्तव्याचा रंग उडवत धुळवड साजरी करताना दिसले.


