प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
कोल्हापूर : गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ संभाजीराजे राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात त्यांचा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी त्यांना दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे.कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे…