पंचडे राजकुमार उदगीर प्रतिनिधी पशुवैद्यकीय, मत्स्यविज्ञान आणि दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील राजमाता जिजाऊ मुलींचे वसतिगृहामध्ये दिनांक १५ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत “विद्यार्थीनीचा व्यक्तिमत्व विकास” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम कक्ष, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर तर्फे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत प्रा. डॉ. भारती पाटील यांनी मुलींनी स्वत:चा व्यक्तिमत्व विकास कसा करावा, या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी अंतर्गत क्षमता वाढविणे, उत्साही बनणे, भावनांना काळजी पूर्वक हाताळणे, संकटांचा धैर्याने सामना करणे, या विषयांवर प्रभोधन केले. तसेच महिलांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान या विषयी माहिती दिली. भारतीय थोर महिला जसे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले इ. यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. सौ. तनुजा तळेकर, योग शिक्षिका यांनी महिला व मुलींसाठीची उपयुक्त विविध योगासने, योगासनाचे फायदे आणि महत्त्व या विषयावर प्रात्यक्षिकासह माहिती दिली. डॉ. माधुरी शेळके, स्त्री-रोग तज्ञ यांनी महिलांमध्ये होणाऱ्या PCOD आणि PCOS या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधक उपाय योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.मत्स्यगंधा पाटील, प्रभारी मुख्य वसतिगृह प्रमुख आणि अध्यक्षा, सक्षम कक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सूत्रसंचालन कु.संकेती बिजूरकरने केले तर कु.तेजस्वीनी चव्हाणने कार्यशाळेच्या व्याख्यात्यांचे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या वेळी सह-समन्वयक डॉ.मोहिनी खोडके, श्री. स्वप्नील घाटगे, डॉ. बुलबूल नगराळे आणि पशुवैद्यकीय, मत्स्यविज्ञान आणि दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर च्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.