प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी – राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मोठ्या भक्ती भावाने श्रीपाद भागवत कथा महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या गोड वाणीतून संपन्न झाली.भक्तांचे भगवंतावर नैसर्गिक प्रेम असते. आत्मा कुठल्या जाती कुळाचा नसतो. जाती कुळ हे देहाचे धर्म आहेत. आत्म्याचे व परमात्म्याचेही धर्म नाहीत. शरीर कुठेही जन्म घेऊ शकते. आत्म्याला जात नाही, असे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे सुरू असलेल्या श्रीमदभागवत कथा महायज्ञ सोहळ्याची सांगता सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने व माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या काल्याच्या महाप्रसादाने झाली. याप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्याच्या कालावधीत विशाल महाराज खोले, अर्जुनगिरी महाराज, रामगिरी महाराज (येळी), ज्ञानेश्वर महाराज पठाडे, अमृत महाराज जोशी, पांडुरंग महाराज घुले यांची किर्तने झाली.
याती कुळ माझे गेले हरपुनी। श्रीरंगा बाचोनी आणू नेणे ।। या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गौळणीचे निरूपण करताना महाराज म्हणाले, श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कूळ सर्व हरपून गेले. आता श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. तुम्ही मला पुष्कळ व वारंवार कितीही शिकवले, उपदेश करता परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममान होऊन गेले आहे. वारकरी सांप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. काला हा एकमेकांना वाटून खायचा असतो. जीव ब्रम्ह ऐक्यरुपी
काला आहे. भगवान गोकुळात तर संत आपल्यासाठी काला करतात. ज्यांना दुसऱ्याचे सुख बघवत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या सुखाचा नाश करू नये, दुसऱ्याला आनंद देणारांना भगवंताकडे जावे लागत नाही .
आत्मा कुठल्या जाती कुळाचा नसतो. जाती कुळ हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाहीत. परमात्म्याचेही नाहीत. शरीर कुठेही जन्म घेऊ शकते. आत्म्याला जात नसते, असे महाराजांनी सांगितले.
या सप्ताह दरम्यान रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, साई आदर्श उद्योग समुहाचे शिवाजीराव कपाळे यांनी भेटी दिल्या. तर काल्याच्या किर्तनास आ. प्राजक्त तनपुरे, सौ. राणीताई लंके, उत्तमराव म्हसे, वारकरी सांप्रदायाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण बानकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, रवींद्र आढाव, शिवाजीराव बंगाळ आदी उपस्थित होते. या सप्ताहास शिलेगावचे उपसरपंच डॉ. पांडुरंग म्हसे यांनी ५ लाख रुपये देणगी दिल्याबद्दल महाराजांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सप्ताह कालावधीत सात दिवस अविरत अन्नदान सुरू होते. हा सप्ताह पार पाडण्यासाठी शिलेगाव, कोंढवड, तांदुळवाडी, केंदळ येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तसेच सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे व ज्ञानेश्वर म्हसे यांनी केले.